About-Marathi

भीमगीत बद्दल

about-bheemgeet

इतिहास हा नेहमी जेत्यांचाच राहिलाय. ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी आपले गुणगान करणाऱ्या खुणा सर्वत्र पेरून ठेवल्या. मग ते ताम्रपट असो, शिलालेख असो वा इतर ऐतिहासिक दस्तावेज. म्हणूनच इतिहास तत्कालीन वंचित ,उपेक्षित घटकांबद्दल आपल्याला फारशी माहिती देत नाही. असे असूनसुध्दा त्या त्या काळची दडपशाही झुगारून सामजिक सुधारणेचा, प्रबोधनाचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तो प्रामुख्याने पोहोचलाय तो गीतांमधून. ही गीतं एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने पाठवली आणि मौलिक विचार जिवंत ठेवले. आधुनिक भारताच्या इतिहासात फुलेंपासून ते आजतागायत प्रबोधनाची चळवळ ही तळागाळातील लोकांत गीतांच्या माध्यमातून पोहोचलेली आहे. निरक्षर असलेल्या समाजात स्फुरण पेटविण्यात, विचार पोहोचविण्यात गीतांची भूमिका ऐतिहासिक आहे. भीमगीत ह्या इतिहासाची मांडणी करणारे एक माध्यम आहे.

भिमगीत म्हटलं की बाबासाहेबांची गाणी असा अर्थ निघतो परंतु ज्या महामानवांमुळे समाजात झालेली क्रांती व बदल ह्या साऱ्यांची मांडणी करणारी, प्रबोधन करणारी तसेच सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारी गीते म्हणजे भिमगीत आणि तोच अर्थ आम्हाला अभिप्रेत आहे. मग ते सामाजिक क्रांती घडवून आणणारे गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकार यांपासून ते माता जिजाऊ, माता सावित्रीमाई फुले, माता रमाई, माँ फातिमा शेख, माता अहिल्याबाई होळकर तसेच दक्षिणेतले पेरियार यांपासून ते महाराष्ट्रातले अण्णा भाऊ साठे यांसारख्या महानव्यक्तीच्या विचारांची गाणी म्हणजे भीमगीतं असे आम्ही मानतो.

www.bheemgeet.com हे जगातलं पहिलं आणि आजघडीला एकमात्र असं भीमगीतांचं पोर्टल आम्ही आपल्या भेटीला घेऊन येत आहोत. यात पोर्टलमध्ये जगभरातल्या सर्व भीमगीतं मग त्यात कव्वाली, भारूडं, ओव्या, पाळणा, कविता, साधी गीतं, पोवाडे, रॅप अगदी आफ्रो अमेरिकनांच्या संघर्ष लढ्यातील गीतं एकाच ठिकाणी आणण्याचं काम भीमगीत डॉट कॉम च्या माध्यमातून आपण सुरू करत आहोत. 

मागील चार वर्षांपासून भीमगीतांसंदर्भात काहीतरी विधायक काम करण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यातून सुरूवात झाली शोधाची. आणि या शोधप्रवासातच एक गोष्ट उमगली. ती अशी की, भीमगीतांचं आकाश इतकं समृद्ध आहे की त्यात येणारी कैक दशकं कधीच खंड पडणार नाही. परंतू ही सर्व गीतं वेगवेगळ्या ठिकाणी विखूरलेली आहेत. त्यांचं या डिजीटल युगात जतन होईल अशी कोणतीही सिस्टीम नाही. आणि, त्यातून आमची कल्पना आकाराला आली आणि ४ एप्रिल २०२३ रोजी आम्ही ‘Ambedkar Lab Initiative’ भीमगीत डॉट कॉम चे नव्याने लोकार्पण केले आहे.

भीमगीतं तयार करणाऱ्या कलाकारांसाठी:

कृपया नोंद घ्यावी आम्ही कोणत्याही प्रकारची कमाई या सामग्रीवर करीत नाही. आम्ही कलाकारांच्या कामाचा आदर करतो, आम्हाला माहित आहे कि एक भीमगीत तयार करण्या मागे त्या कलाकाराची किती मेहनत आणि पैसे लागले असतात. आम्ही तुम्हाला खात्री देतो कि तुमचे संगीत फक्त ऑडिओ स्वरूपात केवळ तुमच्या कलेच्या प्रचारात्मक हेतूंसाठीच वापरले जाईल. तर कलावंतांना नम्र आवाहन आहे की, आपण ही आपल्या कलाकृती ज्या तुम्ही जेथे कुठे अपलोड केलेल्या असतील त्यांच्या लिंक फक्त आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात. आम्ही तुमचं सर्व काम एका ठिकाणी, सिंगल क्लिकवर लोकांसाठी उपलब्ध करून देऊच शिवाय तुमच्या कलाकृतीचे जोरदार प्रमोशनही करू. 

एका गाण्यात लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद आहे आणि ते एक गाणं माझ्या 10 भाषणांच्या बरोबरीचे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
bheemgeet